अनुकंपा याद्यांचा होणार वर्षातून दोनदा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:52 AM2019-07-19T00:52:42+5:302019-07-19T00:54:09+5:30
नाशिक : जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना वर्ग तीन आणि चारमध्ये सामावून घेण्याच्या प्राधान्यानुसार अनुकंपाधारकांची यादी अद्ययावत करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या असून, यापुढे दर सहा महिन्यांनी अनुकंपाधारकांच्या याद्यांचा खातेनिहाय आढावा घेतला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

शासनाच्या २१ सप्टेंबर २०१७च्या सुधारित आदेशानुसार अनुकंपाधारकांना नोकरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही सुधारणा सुचविण्यात आल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या याद्या अद्ययावत करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनुकंपा याद्या आणि नोकरीच्या संदर्भातील माहिती घेतली.
वर्ग तीन आणि चारच्या पदासाठी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांची प्राधान्यक्रम देण्यासाठी खातेनिहाय यादी तयार केली जाते. यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांची एक आणि अन्य विभागांची सामाईक अशा अनुकंपा याद्या असून, सदर याद्या तयार करताना अनुकंपाधारकांचा प्राधान्यक्रम राखला जावा यासाठीच्या सूचना खेडकर यांनी दिल्या आहेत. अपूर्ण याद्यांमुळे अनुकंपाधारक वंचित राहू नये खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. यापुढे सदर याद्यांचा आढावा दर सहा महिन्यांनी घेतला जाणार असल्याचेही खेडकर यांनी सांगितले.