सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 07:06 PM2021-07-27T19:06:25+5:302021-07-27T19:06:37+5:30
सिन्नर : तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
सिन्नर : तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. रविवारी खोपडी खुर्द येथील सोमनाथ दराडे यांच्या घरातील सर्वजण शेतीतील कामासाठी बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाची कुलपे तोडून तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात तीन तोळ्याचा पोहेहार, अडीच तोळ्याचे गाठले, दोन तोळ्याचा लक्ष्मीहार, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि पाच ग्रॅम वजनाची अंगठी यांसह नऊ हजार रुपये रोख रकमेची चोरी झाली आहे.
मुद्देमाल लंपास
दुसरी घटना चिंचोली येथे घडली आहे. संजय झाडे यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी सकाळी दहा ते दुपारी चारच्या दरम्यान डल्ला मारला. यात दीड तोळ्याचे गाठले, अर्धा तोळ्याचे दुबे, दीड तोळ्याचा राणीहार, एक तोळ्याची पोत, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, एक तोळ्याची चेन व एक तोळ्याचा नेकलेस यासह पन्नास हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. झाडे यांचा एक लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक सोमनाथ मुटकुळे, सहायक निरीक्षक सागर कोते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोन्ही घटनांतील साम्य पाहता चोरटे एक असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.