नाशिकरोडला दोघे गणेशभक्त नदीत बुडाले; शोधकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:47 PM2020-09-01T17:47:21+5:302020-09-01T17:47:57+5:30
नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली.
नाशिक : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नदीपात्रात गेलेले दोघे तरुण गणेशभक्त वालदेवी व दारणा नदीच्या पात्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच रोड अग्निशमन दलाच्या दोन बंबासहा रबरी बोट घेऊन जवान घटनास्थळी पोहचले असुन शोधकार्य सुरु आहे.
नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. यावेळी गणरायाला निरोप देताना देवळाली गाव येथे वालदेवी नदीकिनारी वडारवाडीमधील युवक नरेश कोळी हा वालदेवी नदीमध्ये बुडाला. मागील दोन तासापासून त्याचा शोध घेतला जात आहे; मात्र नदीची पाणीपातळी अधिक असल्याने त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचवेळी दुर्देवी घटना चेहडी पंपिंग स्टेशन दारणा नदी संगमावर घडली.
या ठिकाणी श्री गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेलेला अजिंक्य राजाभाऊ गायधनी (22) हा युवकदेखील बुडाला. त्यामुळे परिसरात भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे जवान दोन्ही घटनास्थळी पोहचले असून अजिंक्य आणि नरेश यांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. दरम्यान काही स्थानिक जीवरक्षक तरुणांनीसुद्धा नदीपात्रात सूर फेकला असून दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. घटनास्थळी नाशिकरोड, देवळाली पोलीस पोहचले असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.