नाशिक- कोरोना वाढतोय म्हणून आरोग्य नियमांचे पालन करा असे सांगूनही त्या दुर्लक्ष करणाऱ्या दोन हॉटेल्स चालकांना महापालिकेने पाच पाच हजार रूपयांचा दंड केला केला आहे. शनिवारी (दि.१३) ही कारवाई स्वत: महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली असून त्यामुळे परीसरातील व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.सायंकाळी सात वाजता दुकाने बंद ठेवतानाच शनिवार आणि रविवार दोन दिवस तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. हॉटेल्स चालकांना त्यातून वगळले असले तरी त्यांना एकुण ग्राहक क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होत असले तरी कर्मचारी पातळीवर कारवाई होईलच असे नाही त्यामुळे आयुक्त कैलास जाधव हे स्वत:च रस्त्यावर उतरले असून त्यांनी पेालीस उपआयुक्त अमेाल तांबे, मनपाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या समवेत गंगापूररोडवरील हॉटेल पक्वान आणि ग्रीन फिल्ड येथील कृष्णा हाॅटेल येथे अचानक भेट दिली. त्यावेळी हॉटेल्स मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक होते. त्यामुळे हॉटेल चालकांवर ऑन द स्पॉट दंड करण्यात आला.
यावेळी विना मास्क न वापरणाऱ्यांवर देखील तेथेच कारवाई करण्यात आली.