राज्यात दोन लाख, तर नाशिकमध्ये १ लाख २७ हजार प्रकरणांचा महालोक अदालतीमध्ये निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:47 PM2017-12-10T16:47:02+5:302017-12-10T16:49:28+5:30
नाशिक : सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्याने राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प्रकरणे निकाली काढण्यात विविध जिल्ह्यांना यश आले; मात्र नाशिक जिल्ह्यात एकूण सर्वाधिक एक लाख २७ हजार ५६३ प्रकरणांचा निपटारा झाला. तसेच विक्रमी शंभर कोटी ६८ हजार २५ रुपयांची तडजोड रकमेची वसुली करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी (दि.९) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाज नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले. एकूण एक लाख २७ हजार प्रकरणांचा ५६३ निपटारा झाला. दरम्यान, तडजोड प्रकरणांमध्ये सुमारे शंभर कोटी रुपये जमा करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालत घेण्यात आली. दरम्यान, या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायाधीश शिंदे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, बॅँकांचे अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, महापालिका आयुक्त आदींसोबत बैठक घेऊन लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा न्यायालयात पक्षकारांची गर्दी झाली होती. तसेच विविध शासकीय अस्थापनांसह बॅँका, विमा कंपन्यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधून तीन लाखांपेक्षा अधिक प्रकरणे तडजोडीसाठी या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. यापैकी एक लाख प्रकरणे निकाली निघाली असून, दंडाची एकूण शंभर कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्राधिकरणाचे सचिव जिल्हा न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के यांच्यासह सर्व वकील, जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी प्रयत्नशील होते.
प्रकरणे निकाली काढण्यामध्ये एक लाखाने वाढ
नाशिक जिल्हा न्यायालयांतर्गत विविध तालुक्यांमध्ये विधी प्राधिकरणाच्या वतीने घेतल्या गेलेल्या महालोकअदालतीमध्ये १ लाख २७ हजार ५६३ प्रकरणे निकाली निघाली. गेल्या लोकअदालतीमध्ये २७ हजार प्रकरणांचा निपटारा झाला होता. एकूणच यंदा सुमारे एक लाखाने वाढ झाल्याने हे सर्व विधी सेवा प्राधिकरणाचे यश असल्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले.
काही प्रमुख शहरांमध्ये निकाली निघालेली प्रकरणे अशी...
धुळे - ४ हजार ५५३
जळगाव - ३ हजार ७७३
ठाणे- ३ हजार ६४४
अहमदनगर - १ हजार ९४१
औरंगाबाद - १ हजार ७६१
पुणे - ३० हजार १५३
सातारा - २० हजार ७७७
नागपूर - ११ हजार २४०
यवतमाळ - ७ हजार ८७९