शहरातील दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण
By admin | Published: December 9, 2015 12:16 AM2015-12-09T00:16:50+5:302015-12-09T00:17:24+5:30
शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार
नाशिक : शहरातील दोन शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे़ तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस व रहेनुमा उर्दू स्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला छडीने मारहाण केल्याची तक्र ार पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिक्षिका सीमा यांनी अभय रामदास दहिजे (८ वर्षे) या विद्यार्थ्यास छडीने मारहाण केल्याचे, तर मुख्याध्यापक कुसुम शेट्टी यांनी मारहाणीचे समर्थन केल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. या विद्यार्थ्यास फी न भरल्याने मारहाण केल्याचे समजताच पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिक्षिका व मुख्याध्यापकाविरोधात तक्र ार केली़ तसेच शाळेने बेकायदेशीरपणे केलेल्या फी वाढीच्या कारणावरून अनेक पालकांनी फी भरलेली नाही. त्यामुळेच फी न भरलेल्या मुलांना शालेय व्यवस्थापन हेतुपुरस्सर त्रास देत असून शाळेने नियमानुसार फी आकारण्याची मागणी पालकांनी केली आहे़ दुसरी मारहाणीची घटना रहेनुमा उर्दू स्कूलमध्ये घडली आहे़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिक्षिका तब्बसूम शेख जाफर यांनी तंजील मोबीन शेख (७ वर्षे) यास मारहाण केल्याची घटना घडली़ मुलांच्या भांडणातून शेख यास मारहाण केल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले़