लोहोणेर : वसाका - कळवण रस्त्यावरील हॉटेल सूर्याजवळ दुचाकीला स्विफ्ट कारची धडक बसून लोहोणेर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास घडली. कळवण रस्त्यावर वसाका साखर कारखाना व हॉटेल सूर्या यांच्या दरम्यान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोहोणेर येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगन्नाथ गणपत सोनवणे व त्यांचा मुलगा तन्मय हे त्यांच्या दुचाकीने वसाका साखर कारखान्याच्या दिशेने घराकडे जात होते. यावेळी समोरून कळवणकडून लोहोणेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक (एमएच ४१, व्ही २८४६)ने त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच ४१, एडब्लू ७५५९)ला जोरदार धडक दिली. या अपघातात जगन्नाथ सोनवणे यांचा मुलगा तन्मय याच्या तोंडाला, हाता-पायाला दुखापत झाली असून, त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तर जगन्नाथ सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी हे पुढील तपास करत आहेत. जगन्नाथ सोनवणे हे लोहोणेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते.