आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:52+5:302021-09-11T04:16:52+5:30
नाशिकरोड : पळसे गावाच्या कमानीसमोर नाशिक-पुणे महामार्गावर स्पीडब्रेकर टाळण्याच्या प्रयत्नात मोपेड दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्या युवकाला ...
नाशिकरोड : पळसे गावाच्या कमानीसमोर नाशिक-पुणे महामार्गावर स्पीडब्रेकर टाळण्याच्या प्रयत्नात मोपेड दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला असून, नवाज जहीर खान असे मयताचे नाव आहे, तर दुचाकीचा चालक फैईज मेमन हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसे गावाच्या कमानीजवळ झालेल्या अपघातात भद्रकालीच्या खडकाळी भागातील युवक जागीच ठार झाला आहे.
या प्रकरणी खालिद जाकीर खान (रा. भद्रकाली, खडकाळी) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खालीद खान व माजिद फकीर शेख हे दोघे एका मोपेड दुचाकीवर तर नवाज जहीर खान (१८, रा. खडकाळी, भद्रकाली) व फैईज फिरोज मेमन हे दोघे दुसऱ्या मोपेड दुचाकीवर सिन्नर येथे चाँदशावली दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते. ते चौघेही सिन्नर येथून परत नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकच्या दिशेने येत होते. पळसे गावाच्या कमानीसमोरील गतिरोधकाजवळ गुरुवारी (दि. ९) दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेली पांढऱ्या रंगाच्या आयशरने (एमएच १२ एच.डी. ३२६१) फैईज मेमन व नवाज जहीर खान यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे रस्त्यावर पडल्याने नवाजला अपघातात गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर फैईज मेमन हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी खालीद खान यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.