शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांसह दुपारनंतर ढगही दाटू लागले आहे. ढगाळ हवामानामुळे शहराच्या वातावरणावरही परिणाम होताना दिसत आहे. नाशिककरांना वाढत्या उष्म्याचा त्रास जाणवू लागला आहे. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक वातानुकूलित यंत्रांसह पंखे, कुलरच्या वापरावर भर देऊ लागले आहे. गरिबांचा ‘फ्रीज’ अशी ओळख असलेल्या माठालाही मागणी मिळू लागली आहे, तसेच पिण्याचे पाणी थंड राहावे, यासाठी बाजारात चक्क मातीच्या बाटल्याही उपलब्ध झाल्या आहेत. या बाटल्यांनाही पसंती मिळू लागली आहे. उन्हापासून बचावासाठी पुरुष वर्ग टोपी, तर महिलांकडून स्कार्फचा वापर केला जात आहे. थंड गुणधर्म असलेल्या टरबूज, काकडी, खरबूज यांसारख्या फळांनाही मागणी मिळत आहे.
आठवडाभरापासून शहराचे कमाल तापमान पस्तीशीच्या पुढे स्थिरावत आहे. मात्र, किमान तापमानाचा पारा १२ ते १४ अंशांच्या जवळपास राहत होता, यामुळे नाशिककरांना संध्याकाळपासून पुढे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, चार दिवसांपासून किमान तापमान १७ अंशांपर्यंत जाऊ लागल्याने रात्रीही उकाडा सहन करावा लागत आहे. दमट वातावरणाची अनुभूती सध्या नाशिककर घेत आहेत.