स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमधील गावठाणात विकसित होणार २०४ कोटींचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:38 PM2018-01-04T18:38:00+5:302018-01-04T18:40:45+5:30

नाशिककरांना घबाड योग : जुने नाशिकसह पंचवटी भागातील गल्ली-बोळांचा विकास

 Under the Smart City, 204 crore roads will be developed in the Nashik village | स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमधील गावठाणात विकसित होणार २०४ कोटींचे रस्ते

स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमधील गावठाणात विकसित होणार २०४ कोटींचे रस्ते

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीने त्यासाठी गावठाणातील गल्लीबोळांसह रस्त्यांचे सर्वेक्षण केले असून महिनाभरात त्याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहेतस्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत १६० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढल्या असून त्यातील २५ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत

नाशिक - महापालिकेमार्फत गेल्या तीन वर्षात रस्त्यांवर सातशे कोटी रूपये खर्च झाल्यानंतर पुन्हा २१८ कोटींच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. महापालिकेचे पदाधिकारी नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी झपाटल्यागत काम करत असतानाच स्मार्ट सिटी कंपनीनेही आता रेट्रोफिटींग अंतर्गत जुने नाशिकसह पंचवटीतील काही गावठाण भागात छोटे-मोठे सुमारे २०४ कोटींचे रस्ते विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. कंपनीने त्यासाठी गावठाणातील गल्लीबोळांसह रस्त्यांचे सर्वेक्षण केले असून महिनाभरात त्याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहेत.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत घोषित झालेल्या स्मार्ट शहरांच्या प्रकल्पांचा आढावा बुधवारी (दि.३) मुंबईत केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा यांनी घेतला. त्यावेळी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेट कार्पाेरेशनचे संचालक व महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीला विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्याची सूचना सचिवांनी केली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या बैठकीबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले, स्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत १६० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढल्या असून त्यातील २५ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत तर १३५ कोटींच्या निविदा प्रक्रियेत आहेत. येत्या एक-दोन दिवसात प्रोजेक्ट गोदांतर्गत २३० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीवर तीन पुलांची उभारणी केली जाणार आहे. गोदावरी पात्राची स्वच्छता, अरुणा-गोदावरी संगमावर बॉक्स कल्वर्ट टाकणे, नदीकाठाचे सुशोभिकरण, जेट्टी, होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसविणे, ५.५१ कि.मी.चा सायकल ट्रॅक, सुंदरनारायण घाटाची निर्मिती, लेझर शो, फाउंटन, कोबल स्टोन पेव्हींग आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय, महिनाभरात २०४ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासाच्या निविदाही काढण्यात येणार असून गावठाण भागातील लहान-मोठे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फतही सदर भागातील प्रभागांत रस्त्यांची कामे केली जाणार असली तरी एकाच ठिकाणी दोनदा कामे होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे.
महिनाभरात ६०० कोटींच्या कामांना चालना
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत आता विविध प्रकल्पांसंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महिनाभरात एकूण ६०० कोटी रुपयांच्या आसपास निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर कामाला सुरूवात होणार असून सन २०१९ पर्यंत बव्हंशी कामे प्रत्यक्षात येणार आहेत. एप्रिलमध्ये पाणीपुरवठ्यासंबंधी पाईपलाइन टाकणे तसेच स्कोडा मीटर यासाठी २८२ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Under the Smart City, 204 crore roads will be developed in the Nashik village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.