रक्षणकर्त्या ‘लायन’ला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:33+5:302021-08-23T04:18:33+5:30
मातोरी : रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याच्या पवित्र सणात भावाने बहिणीच्या रक्षणाच्या घेतलेल्या शपथेला अनमोल महत्त्व आहे. रक्षण म्हटले की ...
मातोरी : रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याच्या पवित्र सणात भावाने बहिणीच्या रक्षणाच्या घेतलेल्या शपथेला अनमोल महत्त्व आहे. रक्षण म्हटले की मग बहिणीचे असो वा नजीकच्या व्यक्ती, प्राण्याचे त्याची अनेक उदाहरणे इतिहासात कोरली गेली आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात जीवाची पर्वा न करता सोबत जाणारा वाघ्या कुत्रा असो वा महाभारतातील राजा युधिष्ठिर हा स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर जाणारा कुत्रा. इतिहासात कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला तोड नाही. अशाच कुत्र्याने अनेकवेळा कुटुंबाचे रक्षण केल्यामुळे मखमलाबाद येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सुषमा ढगे यांनी आपल्या लाडक्या रॉट व्हील जातीच्या ‘लायन’ कुत्र्याला राखी बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले.
नात्याची ओढ आणि आपुलकी एका रेशीम दोरीने घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधनाचा सण रविवारी (दि. २२) सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा झाला. बहीण- भावाच्या नात्याला दोरीत बांधणारे रक्षाबंधन साजरे होत असताना मखमलाबाद येथे सदैव आपल्या कुटुंबाची काळजी घेत रात्रंदिवस कडा पहारा देत उभा असलेल्या खऱ्या रक्षणकर्त्या ‘लायन’ ला मखमलाबाद येथील बबन ढगे यांच्या पत्नी सुषमा यांनी त्यास राखी बांधून औक्षण केले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रक्षाबंधनाला त्या कुत्र्याला कुटुंबातील सदस्य व खरा रक्षणकर्ता मानून त्याला राखीच्या बंधनात बांधत असतात. या अनोख्या रक्षाबंधनाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
(फोटो २२ बंधन)