मानोरीत अज्ञाताने शेतातून कांदे फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:57 AM2021-02-16T00:57:27+5:302021-02-16T00:57:48+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल चंद्रभान तिपायले यांच्या शेतात नव्याने लागवड केलेल्या सव्वा एकर उन्हाळी कांद्याच्या लागवडीतून अज्ञान व्यक्तीने कांद्याचे दोन वाफे उपटून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे.
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल चंद्रभान तिपायले यांच्या शेतात नव्याने लागवड केलेल्या सव्वा एकर उन्हाळी कांद्याच्या लागवडीतून अज्ञान व्यक्तीने कांद्याचे दोन वाफे उपटून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे.
शेतकरी विठ्ठल तिपायले रविवारी घरगुती विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर सोमवारी सकाळी कांद्यासाठी पाणी भरायचे असल्याने खाद टाकत असल्याने दोन वाफ्यांमध्ये कांदेच दिसत नसल्याने तिपायले यांच्या चिंतेत भर पडली. तिपायले यांनी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांशी याबाबत विचारणा करत आमच्या शेतात कोणाला कांदे उपटताना बघितले का ? अशी विचारणा केली. मात्र, हा प्रकार कोणाच्याही लक्षात न आल्याने तिपायले यांना यातून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
महागड्या औषधांची फवारणी
यंदा कांदा लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याने तिपायले यांनी महागड्या दराने उन्हाळी कांद्याची रोपे विकत घेतली होती. रोपे विकत घेतल्याने मोठ्या मेहनतीने कांदा लागवड केली होती. वातावरणात सातत्याने बदल होऊनही महागडी औषध फवारणी करून तिपायले यांनी कांदा लागवड केली आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने कांदा पीक जगवित असताना कांदे उपटून फेकण्याचा प्रकार संतापजनक आहे.
माझ्या शेतात याआधी पाईपलाईन फोडून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात हजारो रुपये खर्चून कांदा लागवड करीत असताना त्यात पुन्हा अज्ञात व्यक्तीने कांदे उपटून फेकल्याने मोठे नुकसान झाले आहे.
- विठ्ठल तिपायले, कांदा उत्पादक, मानोरी बु.
मानोरी बुद्रुक येथील विठ्ठल तिपायले यांच्या शेतातून अज्ञात व्यक्तीने उपटून फेकलेले कांदे. (१५ मानोरी कांदे)