लसीकरण थोडे, झुंबड जास्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:14 AM2021-05-08T04:14:58+5:302021-05-08T04:14:58+5:30
नाशिक : शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात ...
नाशिक : शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी परतावे लागले.
नाशिक शहरातील सर्व उपनगरांमध्ये तर सकाळी ७ वाजेपासूनच नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. त्यात विशिष्ट केंदांवर १८ ते ४४ वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे रांगेत उभे राहिलेल्या अनेक ज्येष्ठांना लस न घेताच माघारी परतावे लागले. बहुतांश केंद्रांवर केवळ पहिली लस घेणाऱ्या नागरिकांनाच लस उपलब्ध असल्याचे जाहीर केल्याने दुसरी लस घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला. तर, काही केंद्रांवर शेकडो नागरिक नाव नोंदवून रांगेत उभे असताना केवळ पहिल्या १०० जणांना डोस देऊन लसीकरण थांबविण्यात आल्याने अन्य नागरिकांनाही लसींविना परतावे लागले. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांपैकीदेखील १७० ते २०० नागरिकांनाच लसी मिळू शकल्या. शुक्रवारी काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर काही केंद्रांवर कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात आले. काही केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन तर काही केंद्रांवर केवळ कोविशिल्ड असे वर्गीकरणदेखील करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्या केंद्रांवर जी लस उपलब्ध असेल, तीच घ्यावी लागली.
इन्फो
गर्दीवर नियंत्रण झाले अवघड
लसीकरण केंद्रांवर केवळ आधीच ॲपवरून नावनोंदणी केलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असूनही केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे. ॲपवर निर्धारित वेळेच्याही खूप आधीपासून रांगा लागत असल्याने या रांगांचे नियंत्रण करणे केंद्रांनादेखील मुश्कील झाले आहे.
कोट
लसीकरणासाठी ज्या नागरिकांनी आधी नावनोंदणी केली आहे, त्यांनाच लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करणे हेच नागरिकांच्या दृष्टीने हिताचे आहे. लसीकरणासाठीच्या उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या वाढल्यावर शहरातील सर्वच केंद्रांवर लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
डॉ. अजिता साळुंके, मनपा लसीकरण अधिकारी