वैशाली झनकर-वीर यांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:49+5:302021-08-17T04:21:49+5:30
एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता कार्यादेश काढण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे नऊ लाखांची लाच मागत ...
एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता कार्यादेश काढण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे नऊ लाखांची लाच मागत तडजोडीअंती आठ लाख रुपये घेण्याचे निश्चित करत चालकामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चालक संशयित ज्ञानेश्वर येवले, संशयित प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना अटक केली. झनकर-वीर महिला असल्याने संध्याकाळनंतर कायद्याने अटक करता आली नाही, याचा फायदा घेत आणि ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाई पथकाकडून झालेला काहीसा निष्काळजीपणा यामुळे बुधवारी झनकर-वीर पथकाच्या ताब्यातून निसटल्या. दोन दिवस पथकाला गुंगारा दिल्यानंतर सापळा कारवाई पथकाने शुक्रवारी त्यांना नाशकातूनच अटक केली. तत्पूर्वी त्यांनी ॲड. अविनाश भिडे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता ; मात्र त्या अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच सापळा कारवाई पथकाने झनकर-वीर यांना शोधून अटक करत न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने रविवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती ; मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी पुन्हा झनकर-वीर यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-इन्फो--
चौकशीसाठी कोठडीत वाढ
सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपली आणि प्रकृती सुधारल्याने त्यांना पुन्हा न्यायालयापुढे उभे करण्यात आले. दोन दिवस रुग्णालयात असल्याने पथकाला कुठल्याही प्रकारची चौकशी करता आलेली नाही, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत झनकर-वीर यांना पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.