नाशिक : स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात रूढ केलेले आर्थिक गणित आज तंतोतंत लागू पडते. त्यातून त्यांचा सामाजिक व संवेदनशील दृष्टिकोन तर दिसून येतोच, पण भविष्याचा त्यांनी त्याकाळी घेतलेला आढावाही अधोरेखित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय सप्ताहाअंतर्गत आयोजित अनंत कान्हेरे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि. ८) झालेल्या कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणात न मिळणारी संधी लक्षात घेऊन त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून महाराष्टÑात ग्रामीण भागात जागोजागी महाविद्यालयांची स्थापना केली. त्याकाळी या महाविद्यालयांचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचे गणित त्यांनी दूरदृष्टीने मांडले होते. १०० पटसंख्या असलेल्या एखाद्या महाविद्यालयातील केवळ २० आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांकडून फी घेऊन उर्वरित ८० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे असे सूत्र त्यांनी दिले. त्याकाळी ग्रामीण भागातून शिकलेले विद्यार्थी आज जगभर ठिकठिकाणी उत्तम सेवा देत देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत व हीच दादांच्या कार्याला मिळालेली पावती असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, यशवंत हापे, नानासाहेब पाटील, श्रीकांत बेणी, नानासाहेब बोरस्ते, अॅड. अभिजित बगदे, प्रा. यशवंत पाटील, प्रा. सी. आर. पाटील, संजय करंजकर आदी उपस्थित होते. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रांत दादांनी केलेले काम विलक्षण होते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अफाट होती. अडथळ्यांवर मात करण्याची हातोटी कौतुकास्पद होती. सर्वसामान्यांचे ते कैवारी म्हणूनच अखेरपर्यंत कार्यरत होते. हे गुण आजच्या पिढीत येणे गरजेचे आहे, असेही मधुकर भावे यावेळी म्हणाले.
वसंतदादा पाटील विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व - मधुकर भावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:25 AM