वडनेरभैरव उपबाजारात भाजीपाला लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:19 PM2021-06-13T18:19:31+5:302021-06-13T18:20:14+5:30
चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या वडनेरभैरव परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार वडनेरभैरव येथे संचालक संपतराव वक्ते यांच्या हस्ते भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या वडनेरभैरव परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार वडनेरभैरव येथे संचालक संपतराव वक्ते यांच्या हस्ते भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्याच दिवशी भाजीपाला शेतीमालाची ३०० कॅरेटची आवक झाली. यावेळी काकडी प्रति कॅरेट ३०० ते ४००, भोपळे १५० ते २०० रुपये, शिमला मिरची२०० ते २५० रुपये व मिरची प्रति किलो २५ ते ३० रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाले. यावेळी बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, शेतकरी सुभाष पोपट माळी, अमोल तिडके, सचिन तिडके, दत्तात्रेय ढोमसे, सुनील शेठे, व्यापारी सुनील जगताप, बाबूराव मोरे, गोकूळ निकम, नाझीम भाई व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपबाजार आवार, वडनेरभैरव येथे मागील २ ते ३ वर्षांपासून हंगामी भाजीपाला शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले असून या ठिकाणी समाधानकारक व्यवहार झालेले आहेत. उपबाजार आवारावर विक्री होणाऱ्या शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जात असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला शेतीमाल प्रतवारी करुन वडनेरभैरव येथे विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सर्व संचालक मंडळ, भाजीपाला व्यापारी व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे.