पीडित, अनाथ मुलींचे ‘त्या’ करताहेत पंचवीस वर्षांपासून मातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:45+5:302021-05-09T04:15:45+5:30
मातृत्व! खरे तर खूपच महत्त्व असलेला शब्द! मुलांचे संगोपन करताना त्यांचे भविष्य घडविणाऱ्या मातांमुळे या शब्दाचे मातृत्व अधिक अधोरेखित ...
मातृत्व! खरे तर खूपच महत्त्व असलेला शब्द! मुलांचे संगोपन करताना त्यांचे भविष्य घडविणाऱ्या मातांमुळे या शब्दाचे मातृत्व अधिक अधोरेखित होते. ज्यांना माता-पिता आहेत त्यांचे भाग्यच; परंतु ज्यांना नाही त्यांचे दुर्भाग्यच; परंतु नाशिकच्या निरीक्षणगृहातील चित्र तर यापेक्षा वेगळे आहे. १९९४ पासून सुरू झालेल्या या निरीक्षणगृहात येणाऱ्या या मुलींना समजावून आईची भूमिका निभावणाऱ्यांना हेच खरे आव्हान असते. या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षांपासून अधीक्षक, शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या सीमा दिनेश पाटील (जगळे), लिपिक जयश्री दोंंदे आणि केअर टेकर कल्पना परदेशी या साऱ्या हेच काम अविरतपणे करीत आहेत.
कुणी कुटुंबातील अथवा बाहेरील व्यक्तीमुळे अत्याचारपीडित, तर कुणावर मातृ-पितृ छत्र नाही, कुणी एखाद्याच्या नादाला लागून पळून जाते आणि नंतर फसगत झाल्यानंतर उद्ध्वस्त होते. अशावेळी दोन्हीकडील कुटुंबीयही स्वीकारत नाही, ही त्यात आणखी शोकांतिका, तर काही जणी कुठे तरी चुकीच्या ठिकाणी सापडलेल्या, वाट चुकली, पाय चुकला अशा सर्वच वेगवेगळ्या परिस्थितीतून मुली येथे येतात. मानसिक धक्क्यात असलेल्या या मुलींना पहिल्यांदा भावनिकदृष्ट्या सावरणे हे सर्वांत कठीण काम. त्यानंतर मग त्यांना तेथे रुजवणं, अन्य मुलींबरोबर मिसळल्यावर शाळेत पाठविणे त्यांचा अभ्यास घेणे, स्वावलंबी बनविण्यासाठी कधी शिवणकाम तर कधी संगणक अशा प्रकारचे रोजगाराभिमुख शिक्षण देणे हे सर्वच क्रमाक्रमाने होते आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून मुलींना घडवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या महिला करीत आहेत. सीमा जगळे आणि दोंदे या दोघी पंचवीस वर्षे, तर परदेशी या तर तब्बल २७ वर्षांपासून काम करीत आहेत. वेगवेगळे अनुभव गाठीशी आहेत. खूप आव्हाने आणि संकट येतात; परंतु त्यानंतरही त्यांनी नोकरी नव्हे मातृत्वाच्या भावनेतून काम सुरूच ठेवले आहे.
इन्फो...
कन्यादानही केले, पोलीसही घडविले
महिला निरीक्षणगृहात वाढलेल्या आणि करिअर करणाऱ्या अनेक मुलींना या मातांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव असते. याच निरीक्षणगृहातील महिलांनी एका मुलीचे कन्यादानही केेले आणि तिचा सुखी संसार सुरू केला, तर एक महिला तर पोलीस अधिकारी असून, ती आवर्जून नाशिकला आल्यावर निरीक्षणगृहाला भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करते.