नाशिक - राज्य सरकारचे शेवटचे अधिवेशन होताच, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. तर भाजपाकडूनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना गळाला लावण्यात येत आहे. एकंदरीत राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकांसदर्भात माहिती दिली.
नाशिक येथे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात 791.24 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. विकासकामे रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबबादारी निश्चित करणार असल्याचे महाजन यांनी म्हटले. तर, ठेकेदार विकासकामे रोखून धरत असल्याचा आरोप आमदारांनी या बैठकीत केला आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करताना पडलेल्या पावसाच्या सरासरीवरून नियोजन होते, दुष्काळ निधीचा लाभ पाऊस नसलेल्या तालुक्यांना होत नसल्याकडेही आमदारांनी लक्ष वेधले. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांना विधानसभा निवडणुकांबद्दलही विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना, आगामी विधानसभा निवडणुका 12 किंवा 13 ऑक्टोबरला सुरू होतील, असे सांगितले. त्यासाठी, 10 ते 15 सप्टेंबर या कालावधीत आचारसंहिता लागू होईल, असेही महाजन यांनी म्हटले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपा नेत्यांना सूचनाही केल्या असून कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.