रोहित्र जळाल्याने औंदाणे गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:51 PM2019-08-12T16:51:22+5:302019-08-12T16:51:40+5:30
महावितरणचे दुर्लक्ष : पीठगिरण्यांसह पाणीपुरवठाही बंद
औदाणे : येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणाऱ्या विजेच्या ट्रान्सफार्मर जळून बिघाड झाल्याने गाव पंधरा दिवसांपासून अंधारात आहे. येथील गावकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह पिठाच्या गिरण्या बंद असून त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वीज कंपनीकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
येथील गावात सिंगल फेज योजना असून विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. वीज कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात काही स्वरुपात यंत्रणा सुरू केली परंतु, ती कधी गुल होईल याचा अंदाज नाही. सिंगल फेज योजना पूर्ण कार्यान्वित नसल्याने विद्युत मोटारी, पाणीपुरवठा यासह पिठाच्या गिरण्या बंद असून दळणासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गाव पूर्ण अंधारात आहे. गावात आदिवासी वस्ती मोठी असून ही वस्ती हत्ती नदीच्या काठावर वास्तव्यास आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधारात जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. महावितरणला यासंदर्भात माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहित्रात बिघाड
रोहित्रात बिघाड झाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रोहित्रात तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली परंतु, त्याचाही भरवसा नाही. त्यामुळे पुर्ण सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.
- सविता निकम, सरपंच