नाशिक : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.२७) केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या विधिसंघर्षित बालकासह तलवार, कोयता बाळगणाऱ्या युवकास अटक केली आहे.
एक इसम पेठरोडवरील कॅन्सर हॉस्पिटल परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कॅन्सर हॉस्पिटलजवळील मोकळ्या मैदानातून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी कट्टा (रिव्हॉल्वर) मिळून आला. संशयितावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेला संशयित विधिसंघर्षित बालक असून, त्याच्या विरुद्ध अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी संशयित चेतन गडवे यास धारदार शस्रे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलीस हवालदार राजेंद्र निकम यांना मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने आंबेडकरवाडीतील मारुती मंदिराजवळ छापा टाकून चेतन सुभाष गडवे (२२) याला ताब्यात घेऊन घराजवळ बंदस्थितीतील इंडिका कारची (एमएच ०४ डीजे ४३०६) तपासणी केली. यावेळी डिक्कीत एक तलवार व एक कोयता मिळून आला. गडवे याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.