ग्रामीण कवितांचे ‘गाव व्हिलेज झालंय’
By admin | Published: January 23, 2017 12:36 AM2017-01-23T00:36:26+5:302017-01-23T00:36:45+5:30
ग्रंथ सप्ताह : कवितांमधून व्यक्त झाल्या भावना
नाशिक : ‘सत्ययुगाच्या सांगत गोष्टी अवतरला तरी काळ रे, अजून पाण्यासाठी वण वण फिरतो श्रावण बाळ रे’ ही रवींद्र कांगणे यांची, तर विष्णू थोरे यांनी सादर केलेल्या ‘सारं फुकाचं वाटून बाप माझा झाला तुका, शिळे कोरके खाऊन आम्ही जागवल्या भुका’ या आाणि अशा विविध कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २२) झालेल्या ‘गाव व्हिलेज झालंय’ या कार्यक्रमात करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय सप्ताहात रविवारी ‘गाव व्हिलेज झालंय’ या मातीतील कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रवींद्र कांगणे (सिन्नर), संदीप जगताप (दिंडोरी), विष्णू थोरे (चांदवड), तुकाराम धांडे (इगतपुरी) या कवींनी विविध कवितांचे सादरीकरण केले. यावेळी तुकाराम धांडे यांनी ‘साहीब, अव इथ कयाचा धर्म - जात - पात’ या ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांवर आधारित कवितेचे सादरीकरण करून ग्रामीण भागातील राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यानंतर संदीप जगताप यांनी नोटाबंदीवर आधारित ‘वावराला नांगराचा उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, आमचच आयुष्य झालय हजार पाचशेची जुनी नोट’ ही कविता
सादर केली. विष्णू थोरे यांनी ‘वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लयी खोल दु:ख साकडून येते मुखी डोळ्यामधी वल’, रवींद्र कांगणे यांनी ‘दूर अंधार करण्या बाप जळत राहिला’, तुकाराम धांडे यांनी ‘आई होती तेव्हा जातं गाण गायचं’ आणि रवींद्र कांगणे यांनी बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्ख घर गच्च भरलेल’ आदि कवितांचे सादरीकरण केले. यावेळी सावानाचे कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे, उपाध्यक्ष नरेश महाजन, सांस्कृतिक सचिव वेदश्री थिगळे, नाट्यगृह सचिव जयप्रकाश जातेगावकर, देवदत्त जोशी यांच्यासह काव्यप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)