पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून वीज वारंवार खंडित होत आहे. वीज कमी दाबाने असते, त्यावेळी अनेक वीज उपकरणे सुरू होत नाही. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. कमी दाबाने वीज राहिल्याने बँकेचे इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या चार्जिंग होत नाही, परिणामी बँकेचे संगणक चालू होत नाही. तसेच अत्यंत कमी दाबाने वीज असल्याने संगणक नादुरुस्त होण्याची भीती असते. पांगरी गाव पूर्व भागातील सर्वात जास्त लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील कुक्कुटपालन व्यवसाय जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते तसेच इतर व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात असल्याने येथे उलाढाल सुरू असते. पांगरी व परिसरातील गावातील नागरिकांची इंडियन ओवरसीज शाखेशी दैनंदिन आर्थिक व्यवहार होत असतो. परंतु विजेअभावी बँकेचे सेवा ठप्प होत आहे. शिर्डी येथे जाणारे भक्त काही वेळा येथे थांबून येथील एटीएमचा उपयोग करतात परंतु विजेअभावी येथील एटीएम सुरू होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
चौकट
पूर्ण दाबाने वीज नसल्याने इन्व्हर्टर बॅटऱ्या चार्जिंग होत नाही तसेच वीज असली तरी अत्यंत कमी दाबाने असून नेहमी झटके मारत असल्याने संगणक खराब होण्याची शक्यता असते. पुणे (आरओ) कार्यालय येथे माहिती कळवली असून, लवकरच जनरेटरची व्यवस्था करून बँकेचे व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे.
अजित भोये, शाखा प्रबंधक, पांगरी
चौकट-
पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून वीज वारंवार खंडित होत आहे. इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जाते?
रवींद्र पगार, पंचायत समिती सदस्य, पांगरी.
चौकट-
शेतकऱ्यांची अवस्था ही काही वेगळी नसून अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे मोटर जळण्याचे प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच गावठाण सेप्रेशनसाठी आमची मागणी होती; परंतु अद्याप कारवाई झाली नसून परत एकदा गावठाण सेप्रेशनसाठी पत्रव्यवहार करणार आहे.
- आत्माराम पगार, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना