विंचूर : जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विंचूरनजीकच्या लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे मंदिर परिसर विकासकामी कोट्यवधींचा निधी मिळण्यासह विकासकामांना चालणा मिळणार आहे. दरम्यान, ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त करण्याकामी पुढाकार घेण्यावरून सोशल मीडियावर भाजपा व राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला आहे. तीर्थक्षेत्र डोंगरावर असल्याने कायम हिरवेगार व थंड वातावरणामुळे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथील माजी सरपंच मधुकर दरेकर यांसह स्थानिकांनी लोकसहभागातून छोट्याशा मंदिरास भव्य स्वरूप देऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. सद्यस्थितीत १८ फूट उंचीचा १०८९ चौ. फुटाचा मंदिराचा गाभारा व प्रशस्त सभामंडप पूर्ण झालेला आहे. धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोणातून महत्त्व असलेल्या लोणजाई गडावर शासनाच्या निधीअभावी अद्ययावत सुविधांची वानवा जाणवत होती. लोणजाई गडास ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी भाजपाचे नेते सुरेशबाबा पाटील, कैलास सोनवणे, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना तीर्थक्षेत्रास भेट देण्यास विनंती केल्याने पर्यटनमंत्र्यांनी लोणजाई गडास भेट देऊन तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे प्रस्तावित करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कामाचे प्लॅन व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला. वनविभाग, स्थानिक ग्रामपालिका ठराव, पोलीस ठाण्याकडून शिफारस प्रमाणपत्रे सादर करण्यात आली. यामुळे लोणजाई गडाच्या विकासकामांना निधी प्राप्त होऊन विकासकामांबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही नोव्हेंबर महिन्यात लोणजाई गडास ब वर्ग दर्जा मिळणेकामी प्रस्ताव पाठविणेबाबत तुरुंगातून अर्ज केला होता. त्यामुळे आता ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने भाजपा व राष्ट्रवादीत श्रेय मिळणेकामी काल दिवसभर सोशल मीडियावर युद्ध रंगले. दोन टप्प्यात सुमारे पाच कोटींचा निधी मिळणार असून, पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, मनोरे, लेझर शोसहीत प्रेक्षकगृह, पार ओटे, अंतर्गत रस्ते, वाहनतळ सुविधा, गार्डन, बागबगिच्यातील खेळणी, कारंजे, संरक्षण भिंत आदी कामे नियोजित असून, दुसºया टप्प्यात भक्तनिवास, संतनिवास, व्यापारी गाळे, प्रसाधनगृहे, कुंड विस्तारीकरण व सुधारणा आदी कामे प्रस्तावित आहेत. निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर विंचूरनजीक नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून पाच ते सहा किमी अंतरावर सुभाषनगर गावाजवळ आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. सपाटीपासून अतिशय उंचावर असलेला लोणजाई डोंगर हिरवाईने नटलेला असल्याने येथे पर्यटनासाठी तालुक्यातील नागरिकांची कायम वर्दळ असते. श्रीमंत पेशव्यांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी अतिशय सुंदर असे हेमाडपंती मंदिर सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे.
विंचूर : राजकीय पक्षांमधील रंगलेल्या श्रेयवादाची जिल्हाभर चर्चा लोणजाईगड तीर्थक्षेत्रास ‘ब’ वर्ग दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:15 AM
विंचूर : जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विंचूरनजीकच्या लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्देविकासकामांना चालणा मिळणारभव्य स्वरूप देऊन मंदिराचा जीर्णोद्धार