नियमांचे उल्लंघन : मेनरोडवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:35 PM2020-03-31T21:35:27+5:302020-03-31T21:36:43+5:30
कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्रवार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.
सध्या राज्यासह देशात, गावागावांत कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाउन असूनदेखील कळवण नगरपंचायतीने नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौकात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नागरिकांनी भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी शुक्र वार, शनिवार व रविवारी मोठी गर्दी केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाउन पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची या तीन दिवसात पायमल्ली झाल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या तसेच भाजीबाजार विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाही. सॅनिटायझरचाही वापर कुठेही दिसून आला नाही. शहरातील बाजार मंडईमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून भाजी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते, मात्र कळवणकर जनतेने भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील वाढती गर्दी भाजी बाजारात होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्वरित गर्दीला हाकलून लावले तसेच भाजी बाजार बंद केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नका आणि घरच्यांनाही कोणाला जाऊ देऊ नका, भाजीविक्रेता हा आपल्या गल्लीत येईल तेव्हा भाजी घ्यावी, त्याचीही स्वच्छता लक्षात घ्यावी, घरात राहा, नियम पाळा, स्वत:ची काळजी घ्या आणि कोरोना या संसर्गजन्य आजाराला पळवून लावा.
- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक कळवण