नाशिक : आज स्वातंत्रदिन. पहाटपासून ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘मेरे देश की धरती’, ‘देखो वीर जवानो अपने ’ देशभक्तीपर गीते ऐकून, दूरचित्रवाणीवर शौर्यगाथा पाहून आपले मन अभिमानाने भरून जाईल. शहिदांच्या कहाण्या पाहताना डोळे ओलावतील. पण हे सारे एवढ्या दिवसापुरतेच सिमित रहाते. प्रत्यक्षात शहीद जवानांच्या वीरपत्नी, त्यांचे कुटुंबीय मुलभूत सुविधा, हक्काच्या लाभासाठी सरकार दरबारी चकरा मारून थकत आहेत. शहीद जवानांच्या विधवा आज पतीच्या पश्चात मिळालेल्या सरकारी निधीवर दावा सांगत सासरच्यांनी घराबाहेर काढल्याने जीवनाशी झगडा देत आहेत. परीक्षा देत नोकऱ्यांसाठी आणि पर्यायाने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडत आहेत, चिमुकल्यांच्या शाळाप्रवेशासाठी, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मोलमजुरी करून कशी बशी पोटाची खळगी भरत आहेत. अशा या वीरपत्नींच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न...उच्चशिक्षित वीरपत्नी नोकरीच्या शोधात...पूर्वीच्या काळी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. साहजिकच अल्पशिक्षित वीरपत्नींना पती निधनानंतर विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र हल्ली बहुतांश जवानांच्या पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा अशा विविध क्षेत्रांत पदवी ते पदव्युत्तरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. अशा या वीरपत्नींच्या ज्ञानाचा शासनाने उपयोग करून घ्यावा, त्यांना नोकºया, व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.जिल्ह्यात ३००च्या वर वीरपत्नी असून, त्यांना पती निधनानंतर शासकीय मदतीसाठी, त्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी, पूर्ण झालेल्या फाईल टेबलांवर फिरत असल्याने केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. संगमनेरजवळील एका छोट्या खेड्यात राहणाºया ममता यांचे पती शत्रुशी दोन हात करताना शहीद झाले. त्यांना अनुक्रमे ५ व ८ वयाची मुले आहेत. पती गेले तेव्हा सगळेच सहानुभुती दाखवत होते, पण नंतर मात्र ममता यांना मिळणारे लाभ पाहून नातेवाईक, मित्रमंडळी अनावश्यक सल्ले देऊ लागले, चुकीचे मार्गदर्शन करू लागले. पती शहीद झाल्यानंतर ज्या हक्काच्या गोेष्टी मिळायल्या हव्यात त्या तर मिळाल्या नाहीच, पण सध्या त्यांना अनेक गोेष्टींना तोंड देत मुलांना वाढवावे लागत आहे. सटाण्याजवळील एका छोट्या खेड्यातील लहाने यांचे पती १२ वर्षांपूर्वी शहीद झाले. शासनाने त्यांना दोन गुंठे जमीन देण्याचे जाहीर केले. आज या घटनेला दहा वर्षे होऊन गेले तरी अद्याप त्यांना जमिनीचा तुकडाही मिळालेला नाही. त्यांची त्या जमिनीसंदर्भातली फाइल गावातून मंत्रालयात, मंत्रालयातून परत गावात फिरते आहे. हा प्रवास कधी संपेल आणि लहाने यांना ती जमीन कधी मिळेल याचे उत्तर कोणाकडेच नाही.
जिल्ह्यातील वीरपत्नींचा संघर्ष सुरूच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:12 AM