मांगीतुंगी : ज्ञानमती माताजी यांच्याकडून भगवान ऋषभदेव विश्वशांती वर्ष घोषित
By अझहर शेख | Published: October 22, 2018 01:39 PM2018-10-22T13:39:10+5:302018-10-22T13:53:55+5:30
'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
- अझहर शेख
नाशिक (ऋषभदेवपुरम) : 'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. जगात निर्माण झालेल्या अशांतीचे वातावरण व समाजातील वैरभाव, हिंसा रोखण्यासाठी शासकिय यंत्रणेसह संरक्षण विभागाचे सर्वच दल प्रयत्नशील आहेत. अशा स्थितीत विश्वशांतीसाठी जैन धर्माच्या मूलतत्त्वाचा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी व पाप-पुण्याच्या कल्पना स्पष्ट होण्यासाठी माताजी यांनी हे वर्ष ऋषभदेव विश्वशांती वर्ष घोषित केले आहे. यानिमित्ताने देशभरात यज्ञ, जप, अनुष्ठान, चर्चासत्र, मार्गदर्शन शिबिरे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून भारतासह संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देण्यात येत आहे. या संमेलनाला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. असे संमेलन दहा वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तिनापूर येथे पार पडले होते.
असे झाले श्री भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्रमी मूर्तीचे निर्माण
मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे दुस-या क्रमांकाचे प्राचीन सिद्धक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देतात. मांगीतुंगी पर्वतावर ९९ कोटी मुनींनी तपसाधना करुन मोक्षप्राप्ती केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या पर्वताला जैन धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. पर्वतावर प्राचीन मंदिरे, लेणी, गुहा असून वर्षानुवर्षांपासून येथे जैन समाजबांधवांकडून उपासना केली जाते. जैनधर्माच्या सर्वोच्च गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी १९९६साली चातुर्मासाच्या निमित्ताने मांगीतुंगी येथे आल्या होत्या. त्यावेळी तप, अंतर्ध्यानाने झालेल्या साक्षात्कारानुसार या पवित्र पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ऋषभदेव यांची १०८ फूटी अखंड पाषाणातील मूर्ती निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. माताजी यांनी निश्चित केलेली मूर्तीची जागा पर्वताच्या मध्यावर जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर होती. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तर दूर मात्र पायवाटही अस्तित्वात नव्हती. जगाच्या पाठीवर अखंड पाषाणात १०८ फूटी मुर्ती कोठेही नसल्यामुळे या मूर्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. पर्वताच्या मध्यावर अखंड शिळा शोधून त्यात भगवान ऋषभदेव यांची १०८फूट उंच मूर्ती साकारणे हे एक दिव्यच होते. माताजी यांच्या नेतृत्वाखाली व समितीचे अध्यक्ष कर्मयोगी पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडले. २०१६ साली या विश्वविक्रमी मूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. मूर्तीचा हा पंचकल्याणक महोत्सव सोहळाही विश्वविक्रमी ठरला होता. असा सोहळा दर सहा वर्षांनी मांगीतुंगी या सिध्दक्षेत्रावर साजरा होणार असून यासाठी राज्य शासनाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. समाजाच्या संघटनासाठी मूर्ती निर्माणाचे कार्य महत्त्वाचे ठरले.
ज्ञानमती माताजी यांच्याविषयी थोडसं...
सध्या देशाच्या जैन धर्मातील सर्वोच्च आर्यिका असलेल्या ज्ञानमती माताजी या विसाव्या शतकातील पहिल्या कुमारिका आर्यिका आहेत. उत्तर प्रदेशातील टिकेदनगर येथे त्यांचा जन्म इ.स.१९३४ मध्ये झाला. १९५२मध्ये त्यांनी गृहत्याग करून जैन धर्माची दिक्षा घेतली. त्याकाळी कुमारवयात दीक्षा घेणा-या त्या पहिल्याच बालब्रम्हचारी होत्या. त्यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झालेले असले तरी मात्र गेल्या ६६ वर्षांच्या तपश्चर्येच्या काळात प्राप्त झालेल्या दैवी ज्ञानाच्या जोरावर सुमारे साडेचारशेहून अधिक धार्मिक ग्रंथांची रचना केली आहेत. यामध्ये संस्कृत, हिंदी, प्राकृत, कन्नड व अन्य भाषांमध्ये ग्रंथांच्या रचना आहेत. जैन धर्मातील नवदेवता पूजा व दक्षिण भारतात घरोघरी होणारी कन्नड भाषेतील बारह भावना या धार्मिक विधींचा शोध माताजींनीच लावला. त्यांचे सध्याचे वय ८५ वर्ष असून धार्मिक कार्यात त्यांनी संपूर्ण भारतभ्रमंती केली आहे. मागील ६६ वर्षांपासून दिवसभरातील २४ तासांत केवळ एकदाच आहार व जल त्या घेतात. २०१५ साली हस्तिनापूर येथून सुमारे १६०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन माताजी यांनी नाशिकमधील मांगीतुंगी सिध्दक्षेत्र गाठले आहे. माताजींनी अद्याप दहा ते बारा ठिकाणी जैन तिर्थंकारांच्या जन्मभूमीचा विकास घडवून आणला आहे. राजसत्तेचे धर्मसत्तेसोबत असलेल्यां जिव्हाळ्यामुळे राजकारण व समाजकारण संस्कारक्षम होण्यास मदत होते, असा माताजींचा विश्वास आहे.