स्थायी समितीच्या सभेत शिरला आगंतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:27 AM2018-03-22T01:27:00+5:302018-03-22T01:27:00+5:30

पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.

Visitors visiting the Standing Committee meeting | स्थायी समितीच्या सभेत शिरला आगंतुक

स्थायी समितीच्या सभेत शिरला आगंतुक

Next

नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.
बुधवार, दि. २१ रोजी जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास एक मद्यपी सभागृहात अवतरला आणि त्याने सदस्यांच्या मागच्या बाकाचा ताबा घेतला. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाºयाला त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात प्रवेश मिळविला. मात्र तोंडात गुटखा आणि मद्यप्राशन केलेला हा आगंतुक कोणी पत्रकार नसल्याची बाब चौकशीअंती लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या आगंतुकाचा आवेश पाहून कर्मचाºयांनी दोन हात दूर राहूनच त्याला सभागृहाबाहेर जाण्याचा इशारा केला, मात्र तोच येथील कर्मचाºयांना गप्प राहण्यास सांगत होता. ही बाब सदस्यांच्या लवकर लक्षात आली नाही. सदर बाब कर्मचाºयांनी अध्यक्षांचे स्वीय सहायक खैरनार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सदर बाब थेट व्यासपीठावरील मुख्य कार्यकारी अधिकारी गिते आणि अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी पत्रकारांव्यतिरिक्त सभागृहात बाहेरील व्यक्तींनी बसू नये, अशी सूचना केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे अंगरक्षक आणि कर्मचाºयांनी सदर मद्यपीस सभागृहाबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतरही या पठ्ठ्याने दरवाजा ठोकून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला.  बाहेरील कर्मचाºयांशीही त्याने हुज्जत घातली. या दरम्यान, सभेचे कामकाज आटोपत असतानाच त्या मद्यपीने पुन्हा सभागृहात प्रवेश केला आणि सर्व पदाधिकारी, अधिकारी निघण्याच्या तयारीत असताना त्याने माईकचा ताबा घेत, अध्यक्ष महोदय असे म्हणत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील माईक हिसकावून घेत त्याला पुन्हा सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. बाहेर आल्यानंतर त्यांने अनेक सदस्य आणि अधिकाºयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त कर्मचाºयांनी त्यास विचारणा केली असता त्याने आपण एका आमदाराचा भाऊ असल्याचे सांगितले, तर अन्य एका कर्मचाºयाला त्याने आपण पोलीस खात्यात असल्याचे सांगितले तर काहींना आपण पत्रकार असल्याची बतावणी केली. अखेर सभा संपल्यानंतर येथील कर्मचाºयांनी त्या मद्यपी माथेफिरूस जिल्हा परिषदेबाहेर घालवून दिले. तरीही तो तोतया बराच वेळ आवारात घुटमळतच होता.
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
सभागृहात मद्यपी शिरण्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा यंत्रणेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याची प्रचिती सभेदरम्यान आली आहेच. विशेषत: सभा असल्यानंतर प्रवेशद्वारावर शिपायाची फौज असते. त्यातही त्यांना सभागृहातील सर्वच काळजी घ्यावी लागते. वास्तविक सभेच्या काळात तरी निदान प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे अपेक्षित आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर माजी सैनिक असलेले कर्मचारी रखवालदाराचे काम करता तर काही अधिकाºयांच्या बंगल्यांवर सुरक्षारक्षक म्हणूनही कर्मचारी काम करतात. परंतु जिल्हा परिषदेचा विशेष असा सुरक्षा विभाग नसल्यामुळे शिपायांनाच हे काम करावे लागते. आगामी काळात याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

Web Title: Visitors visiting the Standing Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.