विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे सोमवारपासून नामसप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 05:11 PM2019-08-03T17:11:46+5:302019-08-03T17:12:03+5:30
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक : कापडबाजारातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमवारपासून (दि.५) नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात दि. ५ ते १२ आॅगस्ट या कालावधीत रोज सकाळी ९.३० वाजता संत चरित्र आख्यान होणार असून, नामंवत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. तसेच ज्योतिषाचार्य विद्या बागुल यांचा राशींवर गमती-जमती हा कार्यक्रम, जीवनविद्या मिशनच सुषमा चव्हाण यांचे ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर व्याख्यान, गृहिणींसाठी कार्यशाळा, महिला मंडळाच्या वतीने भजन स्पर्धा, नंदकुमार देशपांडे संचलित सत्यम म्युझिक अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांची भजन संध्या आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, रोज सायंकाळी नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे. दि. १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
इन्फो
महिला भजन स्पर्धा
नामसप्ताहानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला भजन स्पर्धेचे आयोजन दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक भजनी मंडळाला दोन अभंग सादर करावे लागणार असून, आजवर शहरातील नामवंत भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.