मालेगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. किरकोळ वादवगळता बाह्य मतदारसंघात शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे दादा भुसे, काँग्रेस - राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांच्यात सरळ सामना झाला. सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रातच मालेगाव बाह्य मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३ लाख ४० हजार ९११ मतदारांपैकी १ लाख ४५ हजार ५७७ मतदारांनी हक्क बजावला होता.३ वाजेपर्यंत ४२.७० टक्के मतदान झाले होते.दरम्यान, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी येथील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर सहकुटुंब, तर काँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ.तुषार शेवाळे यांनी मोसम-पुलावरील मराठी शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. बाह्य मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर भुसे व शेवाळे समर्थकांनी गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत किरकोळ वादाचे प्रसंगवगळता मालेगाव बाह्य मतदारसंघात शांततेत व उत्साहात मतदानप्रक्रिया पार पडली.मालेगाव बाह्य मतदारसंघातील कॅम्प, सोयगाव, वजीरखेडे, झोडगे, टेहरे, खाकुर्डी, पिंपळगाव (दा.), चंदनपुरी, सौंदाणे आदी गावांमधील मतदान केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दरेगाव येथील केंद्र क्रमांक २१२ वर १ हजार ४६७ मतदार आहेत. या ठिकाणी प्रशासनाने एकच मतदान यंत्र ठेवल्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. सायंकाळी ४ वाजता मतदान केंद्राबाहेर महिला व पुरुषांची मोठी लांब रांग लागली होती, तर खाकुर्डी येथील केंद्र क्र. ४४/०३०८ वरील मतदान अधिकारी के.बी. अहिरे यांच्या आडमुठे धोरणामुळे मतदारांना नाहक रांगेत उभे रहावे लागले. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामकाज संथगतीने सुरू ठेवले होते.
बाह्यमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:57 AM