वडाळा-डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅक संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:29 AM2018-11-01T01:29:22+5:302018-11-01T01:29:38+5:30
:वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडते.
नाशिक :वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडते. टागोरनगर ते वडाळा म्हसोबा मंदिरापर्यंत सावता माळी पाट रस्त्यालगतच्या उजव्या कालव्याच्या जागेत सुमारे सहा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅक एका खासगी प्रायोजकाच्या माध्यमातून विकसित केला गेला; मात्र या जॉगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे कालांतराने काणाडोळा केला गेल्याने जॉगिंग ट्रॅकचे तीन तेरा वाजले आहे. जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचे कुंपण नाहीसे झाले आहे. तसेच पाटाच्या जागेवर तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरील माती नाहीशी होऊन ट्रॅकभोवती खड्डे पडले आहे. गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. जॉगिंग ट्रॅकवरील पथदीपांचे नुकसान झाले असून, काही पथदीप चोरट्यांनी गायब केले आहेत तर काहींचे दिवे फोडण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण परिसरच अंधारात हरविलेला असतो. यामुळे टवाळखोर, मद्यपी, भुरट्या चोरांचा येथे ठिय्या असतो. ओल्या पार्ट्या मद्यपींकडून रंगविल्या जातात; मात्र गस्तीवरील पोलिसांचे वाहन केवळ सरळ रस्त्याने मार्गस्थ होऊन प्रेमीयुगुलांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात. दुचाकीवरून रात्री गस्तीवर असलेले पोलीस बीट मार्शलदेखील अनेकदा या ‘ट्रॅक’वर रात्री ‘विश्रांती’साठी येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. हा जॉगिंग ट्रॅक सुरक्षित करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी सातत्याने केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जॉगिंग ट्रॅकसाठी अत्यंत प्रशस्त जागा आहे. या ट्रॅकच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास आदर्श ट्रॅक उदयास येऊ शकेल.