वाघमारे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:41 PM2018-03-12T18:41:45+5:302018-03-12T18:41:45+5:30
नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी सभागृहात प्रचंड गदारोळ होऊनही वाघमारे हे अजूनही आक्षेपाहार्य शब्दप्रयोग करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या ल. पा. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी प्रचंड तक्रारी असल्याने आणि त्यांच्यावर गैरवर्तणुकीसंदर्भात तीन विभागीय चौकशा सुरू असतानाही वाघमारे अद्यापही आक्षेपाहार्य विधाने करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण सभागृहाने एकमताने वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव संमत केला आहे. असे असतानाही वाघमारे यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी देण्यात आलेली नाहीच या उलट त्यांनी आपले काहीच होऊ शकत नसल्याचा पवित्रा घेत कार्यमुक्त ठरावाची खिल्ली उडविण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जात आहे.
वाघमारे यांनी सर्वधारण सभेच्या सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात आपणाला काहीच माहिती नसल्याचे आणि आपल्याच सहीच्या पत्राबाबत दाखविलेल्या बेजबाबदारपणामुळे सदस्य आक्रमक झाले होते. त्यांनी वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली असता अध्यक्ष शीतल सांगळे यांनी वाघमारे यांच्या कार्यमुक्तीचा ठराव मांडला. या निर्णयामुळे वाघमारे यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे वाटत असताना अद्याप त्यांना कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे समजते. वाघमारे यांच्याविषयीचा ठराव आणि त्यांच्या वर्तणुकीविषयी यापूर्वी झालेल्या तक्रार अर्जांची माहिती विभागीय आयुक्तांना सादर केली जाणार असल्याचेही समजते.
वाघमारे यांच्याविषयी सभागृहाने केलेल्या ठरावाची प्रत आणि त्या संदर्भातील मागणीपत्र विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार असून, त्यानंतर विभागीय आयुक्त योग्य तो निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान, सभेचे इतिवृत्त बनविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश कर्मचाºयांना देण्यात आले आहे. जोपर्यंत विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार नाही तोपर्यंत वाघमारे यांच्यावरील कारवाईदेखील टळणार आहे. मात्र आता वाघमारे यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.