१५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा
By admin | Published: September 28, 2016 11:55 PM2016-09-28T23:55:57+5:302016-09-28T23:56:24+5:30
वडाळागाव : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी
इंदिरानगर : सुमारे १५ वर्षांपासून वडाळागाववासीय बसच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्याप नागरिकांची गैरसोय दूर झालेली नाही. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था पुढाकार घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वडाळागावात सुमारे दहा हजाराची लोकवस्ती आहे. यामध्ये नोकरदार, कामगार व रोजगारीवर उदरनिर्वाह करणाऱ्याची वस्ती मोठी आहे.
गावामध्ये दोनच शाळा असून, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अपुरी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, महाविद्यालयही नाही. त्यामुळे गावातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी शहरात ये-जा करतात. तसेच शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक शहरात ये- जा करतात. परंतु सुमारे १५ वर्षांपासून बससेवा अद्याप सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग व नागरिकांना रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत आहे. रिक्षामध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सात ते आठ प्रवासी असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातूनच लहान-मोठे अपघात झाले आहेत.
हजारोच्या संख्येने लोकवस्ती आणि रस्ता असतानाही सुमारे वीस वर्षांपासून बससेवा का सुरू होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. वडाळागाव ते शालिमार या पट्ट्यावर सुमारे ६0 ते ७0 रिक्षाचालक व्यवसाथ करीत आहेत. त्यांना प्रवासी मिळतात तर बसेसला प्रवासी का मिळणार नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवेअभावी आर्थिक आणि मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)