येवला : तालुक्यातील मातुलठाण येथील अंगणवाडी इमारतीची भिंत पावसाने ढासळली आहे. या परिसरात आठ दिवस रिमझिम पाऊस सुरू होता. येथे सन १९८० ला मातीकामात बांधलेल्या समाजमंदिरात सध्या अंगणवाडी भरत होती.या अंगणवाडीतच पोषण आहार शिजविला जातो. शनिवारी काही काळ अंगणवाडी शिक्षिकेने मुलांना खेळण्यासाठी सोडल्यानंतर त्यावेळेत ही भिंत पडली. त्यामुळे मुलांना कोणतीही इजा झाली नाही. याची तत्काळ दखल घेऊन पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. आहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीच्या खोलीत अंगणवाडी भरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याप्रसंगी सरपंच वत्सला मोरे, उपसरपंच संगीता नागरे, शीतल शेटे, मच्छिंद्र जाधव, संदीप सुरासे, रामदास लहरे, गणेश नागरे, राजू झेंडे, राहुल शिंदे, राजेंद्र झाल्टे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.
अंगणवाडी इमारतीची भिंत पावसाने ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 6:59 PM