नाशिकचे शिक्षक वानखेडे यांचा सलग बारा तास अध्यापनाद्वारे जागतिक विक्रम प्रस्थापित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:21 PM2017-12-20T16:21:14+5:302017-12-20T16:29:09+5:30
नाशिक- १२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापन तंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन करण्याचा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी(दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या विक्रमास प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी तितक्याच उत्स्फुर्तपणे अध्यापनाचे काम केले. या विक्रमाची जागतिक वंडर बुक आॅफ लंडन आणि जिनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. दर्शन वानखेडे हे ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळे, भरीव काम करावे, विद्यार्थी व शिक्षकांची क्षमता जगाला समजावी या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना शिक्षणविस्तार अधिकारी सुनिता राठोड, विजयालक्ष्मी मणेरीकर, अशोक श्रावण, अॅड. प्रविण अमृतकर, नंदलाल धांडे, मुख्याध्यापक कल्पना शिरोडे,अशोक सोंजे यांचे मार्गदर्शन लाभले. याआधी त्यांनी सलग ६ तास श्लोक पठणाचा विश्वविक्रम केला होता. वानखेडे यांनी शिक्षण अध्यापन पदविका पूर्ण केली असून इतिहास विषयात पदवी संपादन केली आहे.तसेच ते सध्या बीएड करत आहेत. सहावर्षापुर्वी अध्यापन क्षेत्रात पर्दापण केलेल्या वानखेडे यांनी ‘एक मिसळ बारा पव’ हे शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवनावर आधारीत बालनाट्य लिहीले आहे. त्यांनी शिक्षणक्षेत्रात वेगळे कार्य करण्याचे स्वप्न पाहिले असून ते आयुष्यभर या स्वप्नाची परिपुर्ती करत रहाणार आहे. हा विक्रम या प्रवासाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.