नाशिक / इंदिरानगर - महानगरपालिकेच्यावतीने आज शहरात पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे पाळला जात आहे. असे असताना आज वडाळा गाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाची नळजोडणी तुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे मनपाकडून 'ड्राय डे' साजरा केला जात असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाणी वाया कसे जाऊ दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जुलै महिना उलटूनही पावसाने हवी तशी हजेरी लावली नसून आणि धरणामध्ये अल्प जल साठा असल्याने महापालिकेच्यावतीने पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्या ठिकाणी दोन वेळेस पाणी पुरवठा करण्यात येत होता त्याठिकाणी एक वेळेस पाणी पुरवठा आणि दर गुरुवारी संपूर्ण शहरात ड्राय डे पाळण्यात येणार असल्याची घोषणा महापौरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज गुरुवार (4 जुलै) रोजी 'ड्राय डे' पाळला जात असताना इंदिरानगर परिसरात काही नागरिकांनी स्व: खर्चाने पाण्याचा टँकर आणून तर काहींनी कूपनलिकेवर जाऊन पाणी भरले त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे 'ड्राय डे' असताना वडाळा गावातील महापालिकेच्या रुग्णालयाचे नळजोडणीच्या पाईपमधून सुमारे पंधरा दिवसापासून गळती होत होती. परंतु आज नळजोडणी तुटल्याने सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
आज 'ड्राय डे' पाळला जात असताना पाणीपुरवठा सुरू कसा? याचा अर्थ काही भागात आज पाणी पुरवठा सुरू असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वडाळा गावात काही भागात आज सकाळी पाणी पुरवठा झाल्याचे या पाणी गळती वरून लक्षात येते.