ओझरखेड कालव्याच्या पाण्यामुळे शिरवाडे परिसरात मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 06:48 PM2021-03-27T18:48:17+5:302021-03-27T18:48:17+5:30
शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.
शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.
मागील दोन महिन्यांत बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून द्राक्षबागांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात द्राक्षबागांची काढणी बऱ्याच प्रमाणावर होत असते. पुढील हंगामातील पीक घेण्यासाठी द्राक्षबागांना पाणी देऊन छाटणी करणे व द्राक्षबागेमध्ये काडी तयार करणे गरजेचे असते.
त्याप्रमाणे प्रतिवर्षी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असते. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा व द्राक्षबागांसाठी पाणी पुरवण्यासाठी साठा ठेवून खरीप हंगामात पाणी दिले जाते. तसेच एप्रिलमधील दिला जाणारा पाणीपुरवठा हा पाटबंधारे विभागाला मुबलक पैसा मिळवून देणारा असतो. त्या पद्धतीनेच या पाण्याचे नियोजन दरवर्षी केले जाते.
यावर्षी खरीप हंगामात फक्त एकच आवर्तन दिले गेले होते. त्यामुळे ओझरखेड धरणात बहुतांशी साठा आहे. मध्यंतरी बेमोसमी पावसामुळे पाणीटंचाई भासली नाही; परंतु गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
रब्बी हंगामातील हे शेवटचे आवर्तन असून किमान ४० दिवसांचे आवर्तन कालव्याला सोडण्यात येते. रानवड, सावरगाव, नांदूर, वावी, गोरठाण, शिरवाडे, पाचोरे वणी, मुखेड, खडक माळेगाव या गावांतील पाणीवापर संस्थांचे ठराव व मागणीनुसार पाटबंधारे विभागाने बैठकीअंतर्गत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याप्रमाणे कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.
पाण्याचा दुरुपयोग करू नये व योग्य प्रकारे पाण्याचे वाटप करून शेतकरीवर्गाने पाण्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता पाणीवापर संस्थांच्या कर्मचारीवर्गाने घेण्यात यावी. तसेच शेतकरीवर्गानेसुद्धा आवश्यक ते सहकार्य पाटबंधारे विभागाला करावे, असे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
त्यानुसार ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्याची माहिती पाणीवापर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून परिसरातील जळू पाहणाऱ्या पिकांना, द्राक्षबागांना तसेच परिसरातील पाण्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना जीवदान मिळणार असून पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
कारण सद्य:स्थितीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळीदेखील खालावत आहे. या कालव्याला पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग व इतर व्यावसायिक, जलपुरवठा योजना आदींना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. (२७ पालखेड कालवा)