सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार बुधवार (दि.२०) पासून तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ टाकी स्वच्छता व हातपंप शुध्दीकरण अभियान राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व सुरक्षित पाण्याचा पुरवठा आणि जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे गावाला शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा मिळण्यास मदत होईल. दरम्यान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी र्ईशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमीत शुध्दीकरण करुन जनतेस निर्जंतुक पाणी पुरवठा करण्याबाबत तालुका व ग्रामपंचायत यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. बुधवारी तालुक्यातील दातली, चिंचोली, मोह, खडांगळी, सोनांबे, मुसळगाव, कारवाडी, देशवंडी, गुरेवाडी, नांदूरशिंगोटे, रामनगर, वडझिरे, भरतपूर, खंबाळे आदिंसह ४० ते ४५ ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपाचे शुध्दीकरण करण्यात आले. त्यावर शुध्दीकरण करणाची तारीख नमुद करण्यात आली आहे. यावेळी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, जिल्हा पाणी गुणवता निरिक्षक, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्वयक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षारक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी आदि उपस्थित होते.
पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:54 PM