मालेगावला चार दिवसाआड पाणीपुरवठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:58 AM2019-07-19T00:58:20+5:302019-07-19T00:58:34+5:30
मालेगाव : शहरासह परिसरात पावसाळा सुरू होऊनही जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून शहरातही पाणी कपात वाढवून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मालेगाव : शहरासह परिसरात पावसाळा सुरू होऊनही जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून शहरातही पाणी कपात वाढवून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील धरणे कोरडीठाक पडल्याने पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. शहराला चणकापूर व गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूरमधून मिळणारे आवर्तन तळवाडे तलावात साठविले जाते. शेवटच्या आवर्तनातून महापालिकेला अपूर्ण साठा मिळाला. ८७ दलघफू क्षमतेच्या बंधाऱ्यात फक्त ५२ दलघफू इतका साठा झाला. त्यामुळे तळवाडे साठवण तलावात अवघा २७ दलघफू इतका साठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने तळवाडे साठवण तलावातून पाणी उचल निम्म्याने कमी करीत गिरणा धरणातून पाणी पंपिंग वाढविले आहे. शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. जोरदार पाऊस झालाच नाही तर चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू आहे.