गुरुवारीही नळाला पाणी
By admin | Published: July 12, 2016 12:20 AM2016-07-12T00:20:39+5:302016-07-12T00:27:44+5:30
पाणीकपात रद्द : महापौरांची घोषणा, मात्र एकवेळ कपात सुरूच
नाशिक : नाशिककरांवर पाऊस असा मेहेरबान झाला, की एकाच दिवसात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. गेल्या दोन वर्षांपासून खळाळून वाहणाऱ्या गोदामाईचे रूप न अनुभवणाऱ्या नाशिककरांनी दुतोंड्या मारुती बुडताना पाहिला आणि जलसंकट टळल्याबद्दल बाणेश्वराचे मनोमन आभार मानले. पावसाच्या या मेहेरबानीमुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याची सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला केली, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी आठवड्यातून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा करतानाच एकवेळ पाणीकपात मात्र सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या मोसमात पहिल्यांदाच गोदामाई दुथडी भरून वाहिली. वालदेवी, दारणा, नासर्डी, वाघाडी नद्या-नालेही भरून वाहिले. एकीकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना नाशिककरांचे लक्ष मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाकडे एकवटले होते. सोशल मीडियावरही धरणातील वाढत्या पाणीसाठ्याची आकडेवारी पोस्ट करत आनंद व्यक्त केला जात होता.