गोदाकाठच्या आठवडे बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:51 PM2021-03-10T20:51:43+5:302021-03-11T01:20:00+5:30
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत आठवडे भाजीबाजार भरविण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार बुधवारी आठवडे बाजार भरला नाही. त्यामुळे गोदाकाठी शुकशुकाट होता.

भाजीपाला विक्रेत्यांनी आठवडे बाजारात बसू नये यासाठी पंचवटी मनपा प्रशासन कालपासून सज्ज झाले होते. अतिक्रमण पथकाने मंगळवारी (दि.९) सायंकाळी भाजी विक्रेते तसेच विक्रेत्यांना सूचना देत भाजीबाजार भरणार नाही असे स्पष्ट केले होते. कोरोना संसर्ग वाढल्याने व त्यातच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आठवडे बाजारावरदेखील बंदी घातली आहे. त्यामुळे बुधवारी गंगाघाटावर पंचवटी महापालिकेचे अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले होते. बोटावर मोजता येतील इतक्या काही भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, मात्र पालिकेच्या पथकाने समजूत काढून त्यांनाही उठवून दिले.
एरवी विविध विक्रेते, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांच्या वर्दळीने फुलणारा आठवडे भाजीबाजार पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र होते. काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने भाजीबाजार पूर्ववत सुरू झाला होता, मात्र भाजीबाजारात येणारे ग्राहक, विक्रेते नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत होते..
लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
गंगाघाटावर दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने ग्राहक व विक्रेते येत असतात. विविध वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. करुणा संसर्ग वाढल्याने बुधवारी आठवडे बाजार भरला असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.