दुर्गम भागात मुलींच्या जन्माचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:35 PM2020-01-13T23:35:36+5:302020-01-14T01:25:44+5:30
इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात गव्हांडे गाव ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ करणारे गाव व शाळा म्हणून हे गाव नावारूपास येत आहे.
गव्हांडे येथील दरवडे परिवाराच्या स्वागतप्रसंगी श्रीराम आहेर. समवेत मुख्याध्यापक संजय कोळी, संजय येशी, तुषार धांडे, मनीषा वाळवेकर आदी.
भास्कर सोनवणे ।
घोटी : इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात गव्हांडे गाव ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ करणारे गाव व शाळा म्हणून हे गाव नावारूपास येत आहे.
कुटुंबात जन्माला आलेल्या एका कन्या रत्नाचा व सन्मान करून एक वेगळी सामाजिक शिकवण येथील शिक्षकांनी देत अनोखा संदेश दिला आहे. गव्हांडे येथील आदिवासी कुटुंबातील वाळू भगीरथ दरवडे व मंदा वाळू दरवडे या परिवारात जन्माला आलेल्या स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात आले. ‘लक्ष्मी आली घरा तो ची दिवाळी दसरा’ या न्यायाने मुलगी जन्माला आली म्हणून मुलीच्या घरापासून ते शाळेपर्यंत त्या नवजात बालिकेची तिच्या आईसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, मुख्याध्यापक संजय कोळी व गावकऱ्यांसह सर्व शिक्षक सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कोळी, पदवीधर शिक्षक संजय येशी, तुषार धांडे, उपशिक्षिका मनीषा वाळवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार धांडे यांनी, तर आभार मनीषा वाळवेकर यांनी मानले.
वंशाचा दिवा म्हणून आजही मुलाच्या जन्माचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते. मात्र येथे शाळा व शिक्षकांच्या वतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे.
- श्रीराम आहेर, केंद्रप्रमुख नांदगावसदो
आमच्यासारख्या आदिवासी कुटुंबात पहिलीच मुलगी जन्माला आली. आमच्या घरात नाही, पण गावात आणि शाळेत एवढा मोठ्या सणासारखा उत्सव होईल असे वाटले नव्हते. या कार्यक्र मामुळे मला मनापासून आनंद झाला. - मंदा वाळू दरवडे, मुलीची आई