राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:29 PM2018-10-22T14:29:47+5:302018-10-22T14:39:10+5:30
ओझर (नाशिक) : जगात अहिंसेचा संदेश देण्यासाठी मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरममध्ये येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज दुपारी १.४० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात आगमन झाले.
ओझर (नाशिक) : जगात अहिंसेचा संदेश देण्यासाठी मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरममध्ये येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज दुपारी १.४० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. ओझर येथील विमानतळावर राष्टÑपतींचे स्वागत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. राष्टÑपती कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद या कार्यक्रमासाठी आल्या आहेत. विमानतळावर नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदि उपस्थित होते. स्वागत झाल्यानंतर राष्टÑपतींसह मान्यवरांनी हेलिकॉप्टरने मांगीतुंगीच्या दिशेने प्रयाण केले. तीन विशेष हेलिकॉप्टरांचा ताफाही मांगीतुंगीच्या दिशेने रवाना झाला आहे. कार्यक्रमस्थळी धातूशोधक यंत्राच्या सहाय्याने तपासणी करून मुख्य मंडपामध्ये प्रवेश दिला जात आहे. या संमेलनासाठी देशभरातून हजारोंचा जनसागर लोटल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सातशे पोलीस कर्मचारी व शंभर पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चारही बाजूने पाच किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी कर्मचाºयांना तैनात केले आहे. यामध्ये महिला कमांडोदेखील ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गुप्तवार्ता, गुन्हे अन्वेषण, स्थानिक गुन्हे शाखा यांची पथकेदेखील दाखल झाली आहेत. या संमेलनासाठी नाशिकसह इंदूर, भोपाळ, दिल्ली, हस्तिनापूर, मुरादाबाद, जयपूर, मुंबई, जळगाव, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, येथून जैन भाविकांचे आगमन झाले आहे. काही भाविकांसाठी मालेगाव, नाशिक, वडाळीभोई, ताहाराबाद, सटाणा येथेही निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.