बरे झाले, भूमाफियानिमित्ताचे कारण मिळाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:19 AM2021-08-19T04:19:56+5:302021-08-19T04:19:56+5:30
गेल्या पंधरवड्यात पोलीस आयुक्तांनी ‘भूमाफिया’ लघुचित्रफीत प्रसारित केली आणि महसूल खात्याला आपली बदनामी झाल्याचे वाटू लागल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांविरोधात ...
गेल्या पंधरवड्यात पोलीस आयुक्तांनी ‘भूमाफिया’ लघुचित्रफीत प्रसारित केली आणि महसूल खात्याला आपली बदनामी झाल्याचे वाटू लागल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांविरोधात ‘सह्यांची जंग’ सुरू केली. सारे अधिकारी यानिमित्ताने एकवटले. संघटितपणे सुरू झालेल्या या मोहिमेतून एकीचे बळ दिसत असले तरी महसूल विभागाची बदनामी ही केवळ पोलिसांमुळेच झाली आहे का, असा थेट सवाल करीत काही अधिकाऱ्यांनी महसुलातील अन्यायकारक आणि गैरप्रकारावरही बोट ठेवल्याने संघटीत मोहिम एकसंध नसल्याचे दिसून आले. त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महसूल खात्यात कामकाजाच्या माध्यमातून छळाच्या होणाऱ्या तक्रारी, बदलीतील अन्याय, विभागीय चौकशा या बाबी घडतातच. मग आता बोलणारे तेव्हा का बोलत नाहीत, असे काही अधिकाऱ्यांना वाटत असेल त्यांचेही समाधान होणे सह्यांच्या मोहिमेला बळ देणारे ठरणारे आहे. त्यामुळे त्यांचा मुद्या औचित्याचा म्हणावा लागेल.
खरेतर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांमधील शीतयुद्ध हे देखील या चित्रफितीमागचे कारण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भूमाफिया प्रकरणावरून प्रशासन प्रमुखावरील राग व्यक्त करण्याला देखील अनेकांना वाव मिळून गेला. समाजमाध्यमांमध्ये महसूल विभागाची बदनामी होत असताना प्रशासन प्रमुख कोणतीच भूमिका घेताना दिसले नसल्याने त्यांना यानिमित्ताने जाब विचारण्यात आला, हेही बरेच झाले. दुसरे असे की, सुडाच्या भावनेतून चित्रफीत केल्याचा वास येत असेल तर पेालीस यंत्रणेनेही आत्मभान राखायला हवे. खरेतर दोन्ही खात्यांना कायद्याचे ज्ञान हे असतेच, त्यातून दोहोंची बदनामीही होऊ नये इतकेच.
पेालीसांनी महसूल अधिकाऱ्यांवर सुरू केलेल्या कारवाया आहेत की कुरबुरी हाही वादाचाच मुद्या आहे. तसेही पोलिसांनी धाडलेल्या नोटिसा आणि सुरू केलेल्या चौकशीतून दोष नसणाऱ्यांनी घाबरण्याचे कारणही नाही. डाग नसलेले अधिकारी सहीसलामतही राहतील; मात्र अन्यायाची परिभाषा केवळ दुसऱ्या विभागापुरतीच मर्यादित राहू नये, असे असे काही अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यातही गैर वाटण्याचे कारणही नाही. यानिमित्ताने का होईना संघटीत संघर्ष हा महसूल विभागांतर्गत होणाऱ्या अन्यायाबाबतचा देखील उभा राहावा किंबहूना याबाबतचा आवाज उठविणाऱ्या बीजांची रुजवात यानिमित्ताने होऊन जावी हेही महत्त्वाचे आहे.
-इन्पो--
चित्रफीत आणि क्लिप
भूमाफिया या चित्रफितीमुळे दोन विभागांमध्ये जुंपलेली असतानाच येवला येथील महिला तलाठीने व्हायरल केलेल्या क्लिपमुळेही महसूल विभागाला डाग लागून गेला. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणाऱ्या महिलेला ‘तमाशा’ म्हटल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहेच, ती अद्याप उघड झालेली नाही इतकेच. याचा अर्थ त्या शांत आहेत, असाही घेता येणार नाही. अन्याय होत असल्याची भावना झालेल्या काही अधिकाऱ्यांनी थेट नाराजी दर्शवलेली आहेच, महिलांमध्येही ठिणगी पडली नाही म्हणजे मिळवले.
-संदीप भालेराव, (वार्तापत्र)