नाशिक : पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पांचा हा आवडता ऋतू असतो. या दिवसांत साप बिळातून बाहेर जास्त राहणे पसंत करतात. यामुळे मनुष्याच्या ते वारंवार नजरेस पडतात. डीजीपीनगर-२मधील केवल पार्क परिसरातील एका रो-हाउसमध्ये कोब्रा जातीच्या विषारी नागाची पाच पिले आढळून आली. सर्पमित्राने ही पिले रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडली. काही दिवसांपूर्वी याच भागातील कामटवाडे परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात घोणस जातीच्या सर्पाची २४ पिले आढळून आली होती.
पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते कोरड्या कृत्रिम जागेच्या शोधात मनुष्याच्या घरांजवळ येण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडे आढळून येणाऱ्या सर्प प्रजातींमध्ये चार सर्प हे प्रामुख्याने अतिविषारी असतात. त्यापैकी एक म्हणजे नाग (कोब्रा). नागाचा दंश हा विषारी असतो. मनुष्यासाठी तो जीवघेणा ठरू शकतो. डीजीपीनगर-२मधील केवल पार्कमधील अष्टविनायकनगर भागात गजानन ताथे यांच्या मालकीच्या एका रो-हाउसमध्ये नागाची पाच पिले आढळून आली. त्यांनी सर्पमित्र तुषार गोसावी यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
गोसावी यांनी रो-हाउस गाठले. तेथे पाहणी केली असता एका चेंबरच्या ‘डक’मध्ये त्यांना नागाची मादी सरपटताना नजरेस पडली. तिला पकडण्याच्या प्रयत्नाच्या अगोदरच घुशीच्या बिळात तिने प्रवेश केला. यानंतर स्वच्छतागृहाच्या जाळीच्या मार्गातून काही पिले थेट रो-हाउसमध्ये शिरल्याने तीन पिले स्वयंपाकगृहात आढळून आली. दोन पिले बेडरूममधून गोसावी यांनी कौशल्याने ताब्यात घेतली. याबाबतची माहिती वन विभागाला त्यांनी कळविली. यानंतर या पाचही पिलांना गोसावी यांनी सुरक्षितरीत्या प्लास्टिकच्या बरणीत बंद करून मनुष्यवस्तीपासून लांब अंतरावर नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
खबरदारी हाच उपायपावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. इमारतींमधील ‘डक’ असो किंवा अडगळीची जागा स्वच्छ ठेवायला हवी. वाहनतळात किंवा घराच्या टेरेसवर असलेल्या टाकाऊ वस्तूंच्या पसाऱ्यातसुद्धा साप आश्रय घेऊ शकतात. यामुळे या जागा स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. सर्प दिसल्यास वन विभागाला किंवा जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा.
कोब्रा सापाविषयी थोडक्यात...
कोब्रा अर्थात नाग हा एकमेव सर्प असा आहे, जो फणा काढून उभा राहतो. हा विषारी सर्प असून मनुष्यप्राण्यासाठी त्याचा दंश धोकादायक ठरू शकतो. त्याचा दंश झाल्यानंतर त्या जागेभोवती बधिरपणा जाणवतो व सूज येते. तोंडावाटे लाळ गळू लागते. श्वासोच्छवासास अडथळे जाणवतात आणि उलट्याही होऊ शकतात. नाग दूध वगैरे असे काहीही पीत नाही, त्याविषयीचा हा मोठा गैरसमज पसरलेला आहे.