फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:37+5:302021-09-03T04:15:37+5:30
नाशिक : गॅस सिलिंडरचे दर प्रतिमाह वाढत आहेत. एक सप्टेंबरला यात पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शहरातील फ्लॅटमध्ये ...
नाशिक : गॅस सिलिंडरचे दर प्रतिमाह वाढत आहेत. एक सप्टेंबरला यात पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शहरातील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचेही आता बजेट कोलमडले असून गॅस सिलिंडर भरून घेणे परवडत नसल्याने आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा सवाल सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून गतवर्षभरात तब्बल पावणे तीनशे रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. त्यासोबतच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्येही कपात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल २७५ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्यावर्षी जुलै, ऑगस्टमध्ये ५९८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता तब्बल ८८८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांतून पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे; परंतु फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना मध्यमवर्गीय नागरिकांना चुलीही पेटवता येत नसल्याने गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
--
महिन्याचे गणित कोलमडले
ग्रामीण भागात किमान चुलीचा वापर करून खर्चात बचत करण्याचा पर्याय आहे; परंतु शहरात फ्लॅटमध्ये राहताना चुलीचा वापरही शक्य नाही. एककडे उत्पन्नात कपात होत असताना महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे.
-रोहिणी साळवे, गृहिणी
सिलिंडर भरणेच परवडत नाही, त्यामुळे पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली आहे. घरात चूल पेटविता येत नाही, अंगणात चूल पेटविण्यासाठी मुलांना लाकडे जमविण्यासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे किमान गॅस सिलिंडर भरण्याचा खर्च पुढे ढकलता येतो.
- अश्विनी पवार, गृहिणी
जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान झालेली दरवाढ
महिना - दरवाढ -घरगुती -
डिसेंबर - १०० - ६९८-
जानेवारी - ०० - ६९८ -
फेब्रुवारी - ७५ - ७७३ -
मार्च - ५० - ८२३ -
एप्रिल - -१० - ८१३ -
मे - ०० - ८१३ -
जून - ०० - ८१३ -
जुलै - २५ -८३८ -
ऑगस्ट- २५ -८६३ -
सप्टेंबर - २५ -८८८ -
--
सबसिडी किती भेटते हे भाऊ (बॉक्स)
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यात प्रामुख्याने सवलतीचा गॅस सिलिंडर सातत्याने महागल्याने शासनाकडून मिळणार सबसिडीही बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
--
व्यावसायिक सिलिंडरही महाग
घरगुती गॅस सिलिंडर सोबत व्यावसायिक सिलिंडरही महागला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थही महागले असून त्याचा जनसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. व्यावसायिक सिलिंडर महागल्याचा परिणाम हॉटेलिंगवरही झाला असून कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेल्या व्यावसायाच्या बजेटवरही गॅस सिलिंडर महागल्याचा परिणाम झाला आहे.