‘ब्रह्मगिरी’बाबत वनविभागाचे मौनव्रत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:02+5:302021-06-10T04:12:02+5:30
धार्मिक-पौराणिकदृष्ट्या तसेच नैसर्गिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सर्रासपणे अवैधरीत्या परवानगी नाकारलेली असतानाही गौण संपत्तीवर उत्खननाद्वारे टाच ...
धार्मिक-पौराणिकदृष्ट्या तसेच नैसर्गिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सर्रासपणे अवैधरीत्या परवानगी नाकारलेली असतानाही गौण संपत्तीवर उत्खननाद्वारे टाच आणण्याचा धक्कादायक प्रकार पंधरवड्यापूर्वी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात सोशल मीडियावर ‘सेव्ह ब्रह्मगिरी’ चळवळीने वेग धरल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला लक्ष घालण्याचे आदेश दिले. महसूल विभागाने चौकशी करत कामात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत दोघा अधिकाऱ्यांना निलंबित केले. यानंतर उत्खनन ज्या जागेत करण्यात आले ते मालकी क्षेत्र की वनक्षेत्र, असा सवाल पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला गेला; मात्र या प्रश्नाचे उत्तर वनविभागाला अद्यापही सापडलेले नाही. निवेदनावर विविध ब्रह्मगिरीप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--इन्फो--
... असे केले प्रश्न उपस्थित
ब्रह्मगिरी कृती समितीने बुधवारी मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांचे कार्यालय गाठले. त्यावेळी तळेगाव त्र्यंबकेश्वर सर्व्हे नंबर ८५, गट नंबर १०४ ही जागा वनविभागाची आहे का?
खासगी विकासकाकडे जागा हस्तांतरित कशी झाली?
सुरुंगाचा वापर करून ब्रह्मगिरी पोखरला जात असताना वनाधिकाऱ्यांनी हरकत का घेतली नाही?
नैसर्गिक संवर्धनाची जबाबदारी कोणाची, या प्रकरणात अधिकारी स्पष्ट भूमिका का घेत नाहीत?
जिलेटिन कांड्यांचा वापर कोणाच्या परवानगीने जंगलालगत केला गेला?
---इन्फो--
अशी आहेत मागणी
मेटघरच्या स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांच्या उपस्थितीत ब्रह्मगिरी कृती समितीला विश्वासात घेऊन प्रत्यक्षरीत्या जागेची पाहणी व निरीक्षण करून सर्वेक्षण पारदर्शकपणे करण्यात यावे. जागेची अचूक मोजणी कागदपत्रांच्या पुराव्यांआधारे केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन मुख्य वनसंरक्षकांच्या वतीने विभागीय वनाधिकारी स्वप्निल घुरे (दक्षता) यांनी स्वीकारले.