आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या भगूर रस्त्यावर असलेल्या वर्मा फार्म हाऊस येथे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत डॅनी वसंत केदारे याने आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी व तिच्या मानलेल्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॅनी केदारे व त्याची पत्नी देवका हे दोघे एकत्र फार्महाऊसवर राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाले होते. त्या वादातून गेल्या महिन्यात संशयित आरोपी देवका व तिचा मानलेला भाऊ संशयित संदीप सीताराम वाघ यांनी कुरापत काढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी डॅनी यास मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय धरून मान दाबून त्यांच्या तोंडात जबरदस्तीने काहीतरी औषध ओतले. यामुळे डॅनी जागेवरच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित देवका व संदीप वाघविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.