संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 06:02 PM2019-02-16T18:02:17+5:302019-02-16T18:27:36+5:30
येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
नाशिक : येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
येवला तालुक्यातील सीआरपीएफचे दिवंगत जवान दिगंबर शेळके यांचा आसाममध्ये मृत्यू झाल्यानंतर सीआरपीएफकडून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शेळके यांच्या मृत्यूविषयी कोणतीही सविस्तर माहिती अथवा त्यांच्या सेवेपासून मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा शेळके कुटुंबीयांना मिळाल्या नाही. त्यामुळे शेळके कुटुंबीयांनी दिगंबर शेळके यांच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करीत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, शेळके कुटुंबीयांसमवेत. निर्मला पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा महाजन, लक्ष्मिकांत पारनेरकर, आशा निकम, अर्चना श्रीवास्तव, सविता पवार, सचिन खटकाळे, रामदास खटकाळे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान, दिगंबर शेळके यांच्या निधनानंतर सीआरपीएफने केवळ त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे कोणतेही साहित्य कुटुंबीयांना पोहोचविण्यात आलेले नाही. तसेच कु टुंबीयांची साधी चौकशीही झाली नसून जवानाच्या मृत्यूनंतर मिळणारे सानुग्रह अनुदान आणि अन्य सुविधांपासूनही शेळके कुटुंबीय वंचित आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली.