नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मयत पत्नीच्या भावाने एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पतीस अटक करण्यात आली आहे.नायगाव -शिंदे रस्त्यावरील घोलप वस्तीवर भगवान गोटीराम बोडके (मूळ रा. शिंपी टाकळी, ता. निफाड) हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून पत्नी गंगूबाई भगवान बोडके व मुलगा आदित्यसह राहत आहे.भगवानला दारू व गांजा ओढण्याचे व्यसन असल्याने मद्य पिऊन आल्यावर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला नेहमी मारहाण करत असे. रविवारी सकाळी दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडण विकोपास जाऊन रागाच्या भरात भगवानने धारदार विळ्याने गळा, हातावर व पाठीवर वार केल्याने पत्नी गंगूबाई बोडके (४१) हिचा मृत्यू झाला.याप्रकरणी गंगूबाईचा भाऊ जनार्दन सखाराम पानसरे (रा. नायगाव) याने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पती भगवान बोडके याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.भगवानने खुनाची कबुली दिल्याने त्यास अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एच.पी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.बी. भवर, पी.बी. म्हसाळे, के.एस. सानप, एन.एस. सांगळे आदी करत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:12 AM