शिक्षक पतीचे निलंबन रद्द करण्यासाठी पत्नीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:16 AM2019-06-04T00:16:02+5:302019-06-04T00:16:29+5:30
बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे तात्पुरते निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी त्यांच्या पत्नीने सुरू केलेले उपोषण चौकशी समितीचे सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
नाशिकरोड : बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे तात्पुरते निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी त्यांच्या पत्नीने सुरू केलेले उपोषण चौकशी समितीचे सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल तुंगार यांना कारणे दाखवा नोटीस न बजावता १७ मे २०१८ रोजी तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले निलंबन रद्द करण्यात यावे, आॅगस्ट २०१८ पासून वेतनाच्या ७५ टक्क्याप्रमाणे निर्वाह भत्ता हा खात्यात जमा करण्यात यावा, विभागीय खाते चौकशी त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्याय करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता पत्नी रंजना तुंगार यांनी सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. याबाबत चौकशी समितीच्या सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांनी तुंगार यांना येत्या ७ जूनपर्यंत पुनर्स्थापित करण्यात येईल, निलंबन निर्वाह भत्ता ५० टक्के देण्यात येईल, चौकशी प्रक्रिया करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच सविस्तर चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासनानंतर रंजना तुंगार यांनी आपले उपोषण मागे घेतले.